पार्श्वभूमी
संघटित व असंघटित कामगार हे औद्योगिक व्यवस्थेचे तसेच अर्थव्यवस्थेचे अविभाज्य व महत्त्वपूर्ण घटक आहेत. असंघटित कामगार साधारणपणे एकत्रित व संघटित नसतात. संघर्षासाठी एकत्र येण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक ती आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक क्षमता नसते. अशा असंघटित घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे माथाडी कामगार.
महाराष्ट्रात माथाडी कामगारांनी श्री. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन 1960–70 या दशकात एकत्र येऊन संघर्ष केला. या लढ्याच्या परिणामी महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर असंघटित कामगार (रोजगार नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 हा स्वतंत्र अधिनियम अस्तित्वात आला.