माथाडी हॉस्पिटलची स्थापना

१. पार्श्वभूमी व स्थापना

महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) कायदा १९६९ च्या कलम ६ (१) अन्वये विविध माथाडी मंडळे स्थापन झाली असून या मंडळाच्या योजनेनुसार माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी माथाडी हॉस्पिटलची निर्मिती झाली आहे. माथाडी हॉस्पिटल (ट्रस्ट) हे माथाडी मंडळांचा कल्याणकारी प्रकल्प आहे. सदर संस्था धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणीकृत आहे. (नोंदणी क्र. ई ८७६८- बी).

शारीरिक परिश्रम करून रोजीरोटी कमावणारा हा एक कामगार होय. आपल्या डोक्यावर, खांद्यावर अथवा पाठीवर जो ओझे वाहतो त्याला "माथाडी कामगार" असं संबोधलं जातं. त्यांची ही अंगमेहनत हा त्यांच्या चरितार्थाचे साधन होय. स्वर्गीय आ. अण्णासाहेब पाटील हे एक महान लढवय्ये, दूरदृष्टी असणारे नेते होते; ज्यांना या ओझे वाहणाऱ्यांबद्दल कणव होती व ते त्यांचे कट्टर समर्थक होते. ते या माथाडी कायद्याचे प्रणेते होत. हे ओळखून त्यांनी डॉ. के. आर. तोरसकर यांच्यासारख्या समविचारी, जाणकार ज्ञानवंताला हाताशी धरून १९७६ साली "मशीद" सारख्या उपनगरात एक दवाखाना सुरू केला.

कालांतराने या दवाखान्याचं रूपांतर पॉलिक्लिनिकमध्ये, नंतर एका छोट्या रुग्णालयात झाले. मशीद येथील बाजार वाशी येथे स्थलांतरित झाल्यानंतर एका सुसज्ज ९९ खाटांच्या रुग्णालयाची कोपरखैरणे येथे वास्तू उभारण्यात आली आहे.

संस्थेच्या इमारतींचे क्षेत्रफळ

  • प्लॉट नं २२, सेक्टर ३ (जुनी इमारत): १४०० चौ.मी.
  • प्लॉट नं ९१, सेक्टर ६ (नवीन इमारत): ११३४.५३३ चौ.मी.
  • प्लॉट नं ९१ (नवीन इमारत विस्तारित): १३८.५६० चौ.मी.

विस्तार व लाभार्थी

आजमितीस या धर्मादाय संस्थेचा वटवृक्षाप्रमाणे विस्तार होऊन सुमारे ३३,३९३ माथाडी कामगार व त्यांचे कुटुंबिय मिळून सुमारे दीड लाखापेक्षा अधिक लाभार्थी या वैद्यकीय सेवेचा लाभ घेत आहेत.

२. कार्यक्षेत्र, व्यवस्थापन व आर्थिक स्त्रोत

कार्यक्षेत्र : मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्हा.

व्यवस्थापन : सभासद मंडळाचे सर्व अध्यक्ष, प्रत्येक मंडळाचे एक मालक प्रतिनिधी व एक कामगार प्रतिनिधी व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा या विश्वस्त मंडळामध्ये समावेश आहे.

आर्थिक स्त्रोत :

  • सभासद मंडळातील मालक वर्ग कामगारांच्या वेतनाबरोबर २% लेव्ही वैद्यकीय सेवेपोटी अदा करतात.
  • वार्षिक रु. १,२००/- प्रत्येक सभासद मंडळाचे नोंदणीकृत कामगार वैद्यकीय सेवेपोटी अंशदान म्हणून अदा करतात.
  • तसेच स्वेच्छेने देण्यात येणारी देणगी.

३. ट्रस्टचे अधिकारी व कर्मचारी

अ.क्र.अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तपशीलपदे
०१मुख्य कार्यकारी अधिकारी०१
०२पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी१४
०३अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (रात्रपाळीसह)१७
०४समांतर वैद्यकीय कर्मचारी५९
०५विना वैद्यकीय कर्मचारी५७
०६बाह्य स्त्रोताद्वारे अर्धवेळ, वैद्यकीय, समांतर वैद्यकीय, विना वैद्यकीय कर्मचारी४४
एकूण अधिकारी व कर्मचारी :१९२
०७मानद विशेषतज्ञ (आठवड्यातून १/२/३ दा सेवेस उपस्थित)४०

४. लेखा परिक्षण (Audit)

या धर्मादाय संस्थेची हिशेब तपासणी अद्ययावत व चोख ठेवली जाते व ती सक्षम अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी तपासली जाते. त्याचप्रमाणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात हा ताळेबंद वेळेवर जमा केला जातो. तसेच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले असून आर्थिक वर्ष मार्च २०२४-२५ पर्यंत या लेखा परिक्षणाचा अहवाल धर्मादाय आयुक्त कार्यालय व आयकर कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

५. ट्रस्टमार्फत पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा

१. बाह्यरुग्ण सेवा (OPD)

ट्रस्टच्या कोपरखैरणे रुग्णालय, मशीद डे केअर युनिट, तसेच खालील १३ आरोग्य केंद्रांमधून रुग्णांना दैनंदिन औषधोपचार दिला जातो:

वाशीकळंबोलीरसायनी न्हावा-शेवाजोगेश्वरीकल्याण मुलुंडठाणेभिवंडी भायंदरचेंबूरअलिबाग मशीद

सन २०२४-२५ मधील हजेरी: २,०९,६९९ रुग्ण

२. आंतररुग्ण सेवा (IPD) व अतिदक्षता विभाग

  • आंतररुग्ण विभाग: कोपरखैरणे येथे ९९ खाटांचा बहुउद्देशीय विभाग कार्यरत. सन २०२४-२५ मध्ये ४,३०० रुग्ण भरती व उपचारित.
  • अतिदक्षता विभाग (ICU): प्रौढांसाठी ०६ खाटा व बालकांसाठी ०२ खाटा असा ०८ खाटांचा ICU कार्यरत. २४ तास कॅज्युअल्टी विभाग उपलब्ध. सन २०२४-२५ मध्ये ८४ रुग्णांवर उपचार.
  • एनआयसीयू (NICU): बालकांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग कार्यरत.

३. शस्त्रक्रिया व इंडोस्कोपी विभाग

कोपरखैरणे रुग्णालयात २ प्रमुख शस्त्रक्रिया गृह, १ नेत्ररोगासाठी शस्त्रक्रिया गृह तसेच ०१ लहान शस्त्रक्रिया गृह (Minor OT) उपलब्ध असून अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज आहेत. सन २०२४-२५ मध्ये २,०३६ लहान-मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या.

इंडोस्कोपी: ओजीडीस्कोपी, सिस्टोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, नेझल इंडोस्कोपी, आणि आर्थोस्कोपी यांसारख्या प्रोसिजर्स दुर्बिणीतून केल्या जातात.

४. रोग निदान सेवा (Diagnostic Services)

  • क्ष-किरण विभाग (X-Ray): ३०० एम.ए. क्षमतेची दोन सिमेन्स डिजिटल क्ष-किरण यंत्रे २४ तास कार्यरत. (सन २०२४-२५: ८,८४४ रुग्ण).
  • सोनोग्राफी: आठवड्यातून ६ दिवस सेवा उपलब्ध. (सन २०२४-२५: २,६२७ रुग्ण तपासण्या).
  • विकृती चिकित्सा विभाग (Pathology): Biochemistry Full Automatic Analyser, CHG Machine 3 part differential, Urino Meter, Coagulometer, ABG Machine २४ तास कार्यरत. (सन २०२४-२५: १,१४,६९२ रक्त तपासण्या).
  • हृदयरोग व इतर विशेष चिकित्सा: २D इको, स्ट्रेस टेस्ट, ईसीजी, ऑडिओमेट्री (कान तपासणी), पी.एफ.टी. (फुफ्फुस तपासणी) याद्वारे ३,८८५ तपासण्या करण्यात आल्या.
  • डायलिसिस विभाग: ०५ युनिट्स कार्यरत असून दररोज १० ते १५ रुग्ण उपचार घेतात. (सन २०२४-२५: २,४७९ रुग्णांवर उपचार).

५. इतर विशेष विभाग

  • दंतरोग विभाग: ३ डेंटल चेअर्स, ३ डेंटल सर्जन व १ मॅक्सिलोफेशिअल सर्जन कार्यरत. रूट कॅनाल, कृत्रिम दात, दंतशस्त्रक्रिया इत्यादी. (सन २०२४-२५: १२,९९५ रुग्ण).
  • भौतिक उपचार विभाग (Physiotherapy): अपघात, फ्रॅक्चर, पॅरालिसिस, पोलिओ व शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांचे पुनर्वसन. (सन २०२४-२५: १७,६९५ रुग्ण).
  • सर्वसमावेशक वैद्यकीय विभाग: आधुनिक उपचारांसोबत आयुर्वेद व होमिओपॅथी विभाग कोपरखैरणे येथे कार्यरत.

६. प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्य संवर्धन व पुनर्वसन

"आजार होण्यापेक्षा आजार न होऊ देणे हे 'वेळीच एक टाका घेतल्यास पुढील ९ टाके वाचतात' या म्हणीइतके सत्य आहे."

  • लसीकरण: बालकांचे संपूर्ण लसीकरण (BCG, DPT, Polio, Measles, Vit-A) व राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन मोहिमेत सहभाग.
  • माता-बाल संगोपन: गरोदरपण, स्तनपान, प्रसूतीपश्चात मातेची काळजी व सकस आहार मार्गदर्शन.
  • स्वच्छता व जनजागृती: हिवताप, टायफॉईड, कावीळ टाळणे, तसेच एड्स, टीबी, हेपॅटायटिस-बी संदर्भात पथनाट्यांद्वारे जनजागृती.
  • कर्करोग प्रतिबंध: तंबाखूमुक्ती शिबिरे आणि स्तन, गर्भाशय मुख व तोंडाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान शिबिरे.
  • पुनर्वसन व साधने: कुबड्या, जयपूर फूट, कमरेचा/मानेचा पट्टा, गुडघा संरक्षक इत्यादी साहित्य वितरण.
  • रक्तदान व प्रशिक्षण: आपत्कालीन रक्तपुरवठ्यासाठी रक्तदान शिबिरे व कामगारांसाठी आरोग्य प्रबोधन.
  • व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम: कामगारांच्या मुला-मुलींसाठी वैद्यकीय व समांतर वैद्यकीय अभ्यासक्रमांची सुरुवात.

७. इतर फायदे व आर्थिक लाभ

  • गर्भवती स्त्रियांना मंडळामार्फत १२ आठवड्यांची भरपगारी रजा व योग्य देखभाल.
  • कामावर असताना अपंगत्व आल्यास कामगार नुकसान भरपाई कायद्यानुसार मंडळाकडून भरपाई.
  • आकस्मिक मृत्यू आल्यास अंत्यविधीसाठी रु. २,५००/- ची मदत.
  • ट्रस्टच्या सल्ल्याने कामगारास बाहेरून उपचार घ्यावा लागल्यास खर्चाच्या ५०% (अर्धी रक्कम) प्रतिपूर्ती.
  • भौतिक उपचारांतर्गत मानेचा/कमरेचा पट्टा, क्रचेस, वॉकर इत्यादी साहित्य ५०% सवलतीत (अर्ध्या किमतीत) देणे.
  • एम.आर.आय., सी.टी. स्कॅन, ई.एम.जी. यांसारख्या तपासण्या नामवंत रुग्णालयांत वाजवी दरात उपलब्ध करून देणे.
  • अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया (उदा. बायपास, हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट, किडनी ट्रान्सप्लांट, ब्रेन सर्जरी) यासाठी ट्रस्टकडून ५०% पर्यंत आर्थिक मदत.

८. विश्वस्त मंडळ (Board of Trustees)

अ.क्र.विश्वस्तांचे नावप्रतिनिधित्व मंडळपद / विश्वस्त वर्ग
१मा. श्री. निखिल वाळकेकिराणा बाजार व दुकाने मंडळअध्यक्ष
२मा. श्री. महेश पां. पाटीलमाल वाहतूक कामगार मंडळउपाध्यक्ष
३मा. श्री. शैलेश बामणेरेल्वे कामगार मंडळविश्वस्त
४मा. श्री. रोहन रुमालेआयर्न स्टील कामगार मंडळविश्वस्त
५मा. श्री. आनंद भोसलेभाजीपाला कामगार मंडळविश्वस्त
६मा. श्रीमती निशा नगरारेमेटल बाजार कामगार मंडळविश्वस्त
७मा. श्री. विजय चौधरीक्लिअरिंग फॉरवर्डिंग कामगार मंडळविश्वस्त
८मा. आ. श्री. शशिकांत शिंदेभाजीपाला कामगार मंडळविश्वस्त
९मा. श्री. बळवंतराव पवारमाल वाहतूक कामगार मंडळविश्वस्त
१०मा. श्री. गुलाबराव जगतापआयर्न स्टील कामगार मंडळविश्वस्त
११मा. श्री. रमेश शि. शेंडगेकिराणा बाजार व दुकाने मंडळविश्वस्त
१२मा. श्री. प्रकाश मस्करमाल वाहतूक कामगार मंडळविश्वस्त
१३मा. श्री. भरत दणाणीरेल्वे कामगार मंडळविश्वस्त
१४डॉ. एच. ए. पाटीलप्रमुख वैद्यकीय अधिकारीविशेष निमंत्रित
१५मा. श्री. सुधाकर कोनाळेरेल्वे कामगार मंडळसचिव